मुंबई : मुंबईतील अभ्युदय नगर, आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन पूनर्विकास हे महत्त्वाचे प्रकल्प या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचं काम सरकार करत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. हे तीन प्रकल्प अदाणी समूहाला देण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे. पूर्वी एक म्हण होती, ‘सारी भूमी गोपाल की’, त्यानुसार ‘सारी मुंबई अदाणी की’ असा सगळा कारभार चालला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.(Uddhav Thackeray)
त्यासोबतच टीडीआरच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं असून येत्या 16 तारखेला अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. शिवालय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
ते पुढे म्हणाले, ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन, रक्त सांडून मिळवली आहे. आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. त्यामुळे ही मुंबई आम्हीदेखील कोणाला आंदण देऊ देणार नाही. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी आणि अदाणी समूहाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या १६ तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा धारावीतून अदाणींच्या कार्यालयावर जाईल. त्यामुळे मी धारावीकरांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या जागा बळकावू देऊ नका. कोणी गुंडगिरी केली तर ठाकरे गटाकडे या. आपण या गुंडांना सरळ करू. असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
इतर अनेक ठिकाणी पुनर्विकास करताना लोकांना ४०० ते ५०० चौरस फूटांची घरं दिली जातात. परंतु, धारावीकरांना ३०० चौरस फूटांची घरं देऊ असं सांगितलं जात आहे. परंतु, धारावीकरांनाही ४०० ते ५०० चौरस फूटांची घरं मिळायला हवीत. योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावं, धारावीकरांना धाक दाखवून, दडपशाही अथवा दमदाटीच्या जोरावर सर्वेक्षण केलं तर शिवसेना हा कट हाणून पाडेल. कुठेही दमदाटी चालणार नाही. तुम्हाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेची ताकद रस्त्यावर उतरेल. असही ठाकरे म्हणाले.