तेंगनौपाल (मणिपूर): मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं वाटत असतानाच आज पुन्हा हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. म्यानमार सीमेवरील तेंगनौपाल जिल्ह्यातील एका गावात 13 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर सोमवारी खळबळ उडाली. मात्र, यामध्ये मृत झालेल्यांकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रे मिळून आलेली नाहीत. पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचाराच्या ताज्या घटनेत किमान 13 लोक ठार झाले, परंतु घटनास्थळावरून कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत.
सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारच्या सुमारास तेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळील लेथिथू गावात दोन गटांमध्ये गोळीबार झाला. माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक परिसरात पोहोचले. सैबोल गावाच्या वायव्येस 10 किमी अंतरावर असलेल्या लेथिथू गावात लष्कराला 13 मृतदेह सापडले, जिथे अलीकडेच आयईडी हल्ल्याद्वारे आसाम रायफल्सच्या गस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ पोहचले असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.