पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच विमाननगर परिसरात घडली. याप्रकरणी नराधम पतीला विमाननगर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अशोक लक्ष्मण आढाव (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आढाव आणि त्याची पत्नी विमाननगर भागातील एका उपाहारगृहात जेवण करण्यासाठी गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक आढाव चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीशी वाद घालत होता. त्यामुळे पत्नी उपाहारगृहातून बाहेर आली. आढाव याने पुन्हा उपाहारगृहासमोर वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला.
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. आढावने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख या घटनेचा अधिक तपास करत आहेत.