पुणे : पुणे महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे जाहिरात फलकांचा (होर्डिंग) परवाना नुतनीकरणासाठी सुमारे नऊशे जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर नुतनीकरणासाठी अर्ज प्रक्रिया न करणाऱ्या व अनधिकृत असणाऱ्या होर्डींगवर महापालिकेडून सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात फलक नियमन व नियंत्रण नियमानुसार जाहिरात फलकांसाठी शुल्क वाढ करण्यात आली आहे. महापालिकेची जुनी हद्द आणि 2017 नंतर समाविष्ट झालेल्या 34 गावांसह महापालिकेच्या नवीन हद्दीसाठी होर्डींग शुल्कामध्ये करण्यात आली. या दर वाढीनंतर आता अनधिकृत होर्डींगवर कारवाईस सुरूवात करणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सध्या महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे एकूण 1900 होर्डींगची नोंदणी आहे. त्यामधील आतापर्यंत सुमारे 900 होर्डींगसाठी परवाना नुतनीकरण करण्याबाबतचे अर्ज विभागाकडे दाखल झाले आहेत. त्यानुसार, पुढील प्रक्रिया होणार आहे. मात्र उर्वरीत 900 होर्डींगच्या नुतनीकरणासाठी अर्ज दखल झालेले नाहीत. त्यामुळे नुतनीकरणासाठी अर्ज दाखल न करणाऱ्या होर्डींग अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.