मुंबई: भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मासाठी एकदिवसीय विश्वचषक हे सर्वात मोठे मिशन होते. मेगा इव्हेंटच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघ ट्रॉफीचा दावेदार दिसत होता. रोहित आणि कंपनीने उपांत्य फेरीसह सलग 10 सामने जिंकले, परंतु अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले, काही दिग्गजांनी संघाच्या कामगिरीवर निशाणा साधला तर काहींनी ऑस्ट्रेलियाची बाजू घेतली. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला पराभवाचे कारण विचारण्यात आले, तेव्हा प्रशिक्षकाने अखेर सत्य उघड केले.
वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पराभवाला 10 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुमारे 11 दिवसांनंतर, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत बैठक घेतली. मेगा इव्हेंटनंतर कर्णधार रोहित शर्मा लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. त्यामुळे हिटमॅन व्हिडिओ कॉलद्वारे मीटिंगमध्ये सामील झाला. या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघांची निवड आणि भविष्यातील योजनांवरही चर्चा झाली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. दैनिक जागरणमधील वृत्तानुसार, विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाच्या कारणाबाबत बोर्ड अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रश्न विचारला.
द्रविडने अहमदाबादच्या खेळपट्टीला दिला दोष
वृत्तानुसार, द्रविडने पराभवासाठी अहमदाबादच्या खेळपट्टीला जबाबदार धरले. तो म्हणाला की, खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना अपेक्षित टर्न मिळाला नाही. हे या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जुन्या खेळपट्टीचा वापर करण्यात आला होता. हा सामना त्या खेळपट्टीवर खेळला गेला, ज्यावर यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. पहिल्या डावात भारतीय संघाला मधल्या षटकांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मदत मिळाली.