संदीप टुले
केडगाव : पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सोसायटीमध्ये समाविष्ट असलेल्या देलवडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्ययक्षपदी एकेरीवाडीचे सोनबापू टुले यांची बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेवेळी टुले यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी (सचिव) दत्तात्रय शितोळे यांनी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले.
संस्थेचे पूर्वीचे अध्यक्ष रामकृष्ण टुले यांनी संस्थेचे कामकाज उत्कृष्टरित्या सांभाळले. आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने पुढील सदस्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या निवडीवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी वाघोले, दौंड खरेदी-विक्री संघाचे संचालक मोहन टुले, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, दत्तात्रय कोंडे, दत्तात्रय शेलार, अनिल शेलार, गणेश लव्हटे, ज्ञानदेव शेलार, मिलन शेलार, अलका झांजे, लक्ष्मण टकले, अशोक पवार, माजी संचालक शंकर टुले, तुकाराम टुले, नानासाहेब टकले, सुदाम टकले, बापू बरकडे, झुंबर टकले, प्रवीण टुले, दिलीप साळवे आदींसह इतर सभासद उपस्थित होते.
सभासदांना १२ टक्के लाभांश
देलवडी सोसायटीला यंदा १०४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या संस्थेची सभासद १,३३६ एवढी आहे. या संस्थेचे एकूण भागभांडवल हे १,२७,४९,०१६ पर्यंत पोहचले असून, यावर्षी लाभार्थी सभासदांना येत्या काही दिवसांत १२ टक्क्यांनी लाभांश वाटला जाणार आहे. लाभांश थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या खत विभागातून संस्थेला १,५१,२४७.५२ रुपये नफा झाला असून, या संस्थेची स्वतःची २४,४६,२८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. या संस्थेच्या कामकाजाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.