विशाल कदम
लोणी काळभोर : पुणे ते गोवा ही सायकल स्पर्धा निर्धारित वेळेपेक्षा १२ तास अगोदर पूर्ण करून हडपसर येथील रणधीर टकले यांनी चौथा क्रमांक पटकावला. त्यामुळे अमेरिका येथे होणाऱ्या (रॅम) रेस क्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
‘इन्स्पायर इंडिया’ या संस्थेतर्फे भारतामध्ये डेक्कन क्लिक हँगर ही पुणे ते गोवा सायकल स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. ६४३ किलोमीटर अंतर ३६ तासांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट स्पर्धकांना असते. जर ३२ तासांत हे उद्दिष्ट पूर्ण केले तर रॅम स्पर्धेत त्यांची निवड होते. पुणे ते गोवा ही सायकल स्पर्धा रणधीर टकले यांनी अतिशय खडतर प्रवास करून निर्धारित वेळेच्या १२ तास अगोदर म्हणजे २६ तासांमध्ये पूर्ण करून चौथा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा पुणे येथील कर्वेनगरपासून सुरु होऊन बेंगलोर महामार्गावरून वाई, महाबळेश्वर, मेढा, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, बेळगाव, हुबळी, चंदगडमार्गे अंबोली घाटातून सावंतवाडी मार्गे मुंबई-गोवा महामार्गावरून पणजी व पुढे दक्षिण गोव्यामध्ये बोगमलो बीच येथे ही स्पर्धा समाप्त झाली.
या स्पर्धेमध्ये टकले यांना उद्योजक दशरथ जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेविषयी माहिती देताना टकले यांनी सांगितले की, पुणे ते गोवा ही स्पर्धा प्रचंड मेहनतीची असून, रस्त्यामध्ये अनेक अडथळे पार करत स्पर्धक जात असतात. खडतर प्रवास, वाऱ्याचा वेग यामुळे अडथळे निर्माण होत होते. घाटामध्ये सायकलची चेन पडल्याने सायकल घसरली व टकले यांना दुखापत झाली. आंबोली घाटातील रस्ता खराब असल्यामुळे स्पर्धकांना याचा खूपच त्रास झाला. त्यामुळे स्पर्धकांचा खरा कस आंबोली घाटातच लागत होता.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे स्पर्धकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. त्याही परिस्थितीत टकले यांनी ही स्पर्धा पूर्ण करत चौथा क्रमांक पटकावला. टकले यांनी यापूर्वी सायकलिंग, पोहणे, धावणे आदी विविध स्पर्धांत भाग घेतला असून, त्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. परंतु मुंबई-गोवा ही सायकल स्पर्धा अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केल्याबद्दल त्यांचे पुणे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.