MP Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणाले, 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay raut)
ते पुढे बोलताना म्हणाले, दत्ता दळवी हे निष्ठावान सैनिक, कधीच झुकणार नाहीत, जबरदस्ती जेलमध्ये डांबून ठेवलं जातंय, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच, पाच राज्यांच्या निवडणुकांवरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ओपिनिअन पोलची दिशा म्हणजे 2024 च्या सत्तापरिवर्तनाची झलक आहे. तसेच, 2024 मध्ये भाजपपासून देशाला मुक्तता मिळणार आहे.(Ajit Pawar)
पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणून ज्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळू शकतो, अशा गुन्ह्यांमध्येही राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं आणि आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही राजकीय विरोधकांच्या विरोधात सत्ता कशी वापरू शकतो, पोलिसांनी स्वतःची बाजू न्यायालयात वेळेत मांडू नये म्हणून दबाव टाकला जात आहे. असं करुन कार्यकर्त्यांना तरुंगात ठेवायंच. काही हरकत नाही ठेवा असंही संजय राऊत म्हणाले.
ते म्हणाले, 2024 पासून उलटं चक्र सुरू होणार आहे. तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. पण, त्या काँग्रेसनं, त्या काँग्रेसच्या राहुल गांधींनी, प्रियांका गांधींनी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमुक्त भारत ही गर्जना करणाऱ्यांना घाम फोडला आहे. पंतप्रधानांना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय.
गृहमंत्र्यांना अख्खा देश वाऱ्यावर सोडून राहावं लागतंय. हे तुमचं काँग्रेसमुक्त भारताचं लक्षण नसून 2024 ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, त्याची हवा आहे. मला पूर्ण खात्री आहे, राजस्थानसह इतर सर्व राज्यांमध्ये इंडिया आघाडीचं सरकार असेल. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.