कर्जत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं हे सतत सांगितलं जातं असते. शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही बोलूनही दाखवली होती. या चर्चा होत असताना अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती, मात्र त्यांनी ती घेतली नाही असं सांगितलं आहे. कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात बोलताना प्रफुल पटेल यांनी हा खुलासा केला आहे
“अजित पवार यांनी मुख्यमंत्री, तर शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा होती. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु, त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष केलं. त्यानंतर एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधान झाले. परंतु, सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. आम्ही १३५ पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरी यांना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला”, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात दिली.
“या सर्व गोष्टी घडल्यानंतर मी लगेच शरद पवार यांना भेटलो. आपल्याला मोठी संधी असून तुम्ही भूमिका घ्या, अशी गळ मी शरद पवार यांना घातली. त्यावर शरद पवार यांनी १५ मिनिटात बैठक संपवून नंतर बोलू असं म्हणत आलेली सुवर्णसंधी घालवली. काय झालं हे मला काही कळलं नाही. परंतु, शरद पवार हे पंतप्रधान झाले नाहीत. ते पंतप्रधान झाले नाहीत याची खंत माझ्या मनात कायम आहे, असंही प्रफुल पटेल म्हणाले.” अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे कर्जत येथे अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये भाषण करताना शरद पवारांविषयीचं हे गुपित प्रफुल पटेल यांनी सांगितलं.