पुणे : मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे.
मंदिरातील पैसा धर्मकार्याव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे तरी मंदिरांचे जतन, संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ आणि ३ डिसेंबर २०२३ रोजी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने एक मंत्री उद्घाटन सत्राला उपस्थित राहील, असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी श्री विघ्नहर ओझर गणपति मंदिराचे अध्यक्ष गणेश कवडे, श्री लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, श्री भीमाशंकर मंदिराचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांसह सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची उपस्थिती होती.
यावेळी सुनील घनवट पुढे म्हणाले की, या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ६३५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत.
यात मुख्यत्वेकरून ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक नीलेश खरे, श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी, राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी यांसह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर, पैठणचे नाथ मंदिर, गोंदवले येथील श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिर, अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.