दीपक खिलारे
इंदापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय व म्हशीच्या दुधाला उत्पादन खर्चापेक्षा अतिशय कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यात शासकीय दूध खरेदी केंद्र सुरू करुन शासकीय दराने दूध खरेदी दर निश्चित करावे.
जेणेकरून दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबवावी, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने दूधाला 34 रुपये दर मिळावा या मागणीसाठी 4 डिसेंबरपासून तहसील कार्यालय, इंदापूर येथे आमरण उपोषण केले जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी अध्यक्ष दीपक काटे यांनी ही मागणी केली. सदरची मागणी मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
काटे पुढे म्हणाले, राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दूध संघाने दूधाला 34 रुपये दर द्यावा, असा आदेश काढला होता. परंतु त्यांच्या या आदेशाला न जुमानता दूध संघाकडून 26-27 रुपये दर दिला जात आहे.
त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शासनाचा दूध संघावर कोणताच अंकुश राहिला नाही. महामारी, दुष्काळ आदी संकटातूनही दूध उत्पादक व्यवसाय करत आहेत. अशातच त्यांच्यापुढे दूध दराचे संकट आवासून उभे राहिल्याने त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांचा दूध उत्पादनावर होणारा खर्च पाहता उत्पादन खर्चाच्या महागाई निर्देशांकानुसार शासनाने निश्चित दर परिपत्रामार्फत जाहीर करण्यात यावे, तसे शासन निर्णय सहकारी व खाजगी दूध संघ या दोघांनाही लागू करावे, असे काटे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील दूधगंगा सहकारी दूध संघ बंद पडलेला असल्यामुळे कारणामुळे त्याचा फायदा घेऊन खाजगी दूध संघ हे मनमानी कार्यभार करत आहे. अशा अनेक बेकायदेशीर आणि मनामानी खाजगी दूध संघावर शासन, प्रशासन यांनी कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दीपक काटे यांनी केली.
दूधदरासंदर्भातील चावी इंदापूरातील एका व्यक्तीकडे
सध्या संपूर्ण राज्यात दूधदराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक संघटनांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला जात आहे. या दूध दरासंदर्भात शिवधर्म फाउंडेशन ही रस्त्यावर उतरला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काटे म्हणाले की, ”दूध दरात वाढ करायची व कमी करण्याची याची चावी ही इंदापूरातील एका व्यक्तीकडे” असल्याचे सांगितले.