मुंबई: राहुल द्रविड हेच भारतीय संघाचे मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टापचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. विश्वचषकाच्या फायनल नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने (BCCI) राहुल द्रविड यांना कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविडने ही ऑफर स्विकारली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे. त्याशिवाय तो स्टँड इन मुख्य कोच असेल. म्हणजेच, राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला धडे देणार आहे.
2023 च्या विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. यानंतर माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला टी-20 संघाचे प्रशिक्षक बनवण्याची चर्चा होती, मात्र त्याने याला नकार दिला. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला. टीम इंडिया सध्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण या मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. या मालिकेतून द्रविड पुनरागमन करणार आहे. या मालिकेत 3 टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. द्रविडशिवाय संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळही वाढवण्यात आला आहे. यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा समावेश आहे.
यानंतर राहुल द्रविड म्हणाला की, बीसीसीआयने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोचिंग दरम्यान मला बराच वेळ घराबाहेर राहावे लागते. अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा मी विसरू शकत नाही. विश्वचषकानंतर नव्या आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत.