देहू : देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. देहूच्या दीडशे एकर गायरानापैकी ५० एकर गायरान हे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी देण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु आहेत. याला देहूकरांचा मोठा विरोध असून हे गायरान देहूतील नागरिकांच्या हक्काचे आहे. या गायरानाला वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे. जोपर्यंत राज्य सरकार आमच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोरच ‘गायरान वाचवा…गाव वाचवा’ असे म्हणत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.