कर्जत : खून तसेच विनयभंगासारख्या तीन गंभीर गुन्ह्यात मागील सात-आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष हौसराव गोयकर, वय- ३३, रा खंडाळा, ता कर्जत जिल्हा अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांचे न्यायालयात वारंवार गैरहजर होता. वारंवार शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून तसेच विनयभंगासारख्या तीन गुन्हे संतोष गोयकरवर दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा मागील सात ते आठ महिन्यांपासून फरार होता. गोपनीय माहिती काढून कर्जत पोलिसांनी शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मिरजगाव येथून अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव पोलीस जवान दीपक कोल्हे जालिंदर माळशखरे कर्जत पोलीस स्टेशन यांनी केली.