राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : मानवी जीवनात उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्सव प्रत्येकाला आवडतात. रोजच्या रुक्ष जीवनातून अल्पकालीन मुक्ती मिळून जीवनात आनंद निर्माण करतात. उत्सवाने मानव संस्कारी बनतो. उत्सव हे प्रेमाचे पोषक, प्रसन्नतेचे प्रेरक, धर्माचे संरक्षक आणि ऐक्याचे साधक आहेत, असे उद्गार प्रा. रतिलाल बाबेल यांनी कुकडेश्वर (पूर, ता. जुन्नर) येथे व्यक्त केले.
स्वर्गीय रामचंदजी बाबेल ट्रस्ट, धोलवड यांच्या वतीने कुकडेश्वर येथील मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रा. बाबेल म्हणाले की, भारतीय संस्कृतीत कार्तिक महिन्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात विष्णू आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते तसेच त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वात लावून दीपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमा हा तुलसी विवाह साजरा करण्याचा शेवटचा दिवस असतो.
याला देव दिवाळी असे सुद्धा म्हणतात. चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा, हाच उद्देश दीपोत्सवामागे असतो. जेथे प्रकाश असतो तेथे अंधार नसतो. मानवी जीवनातील अविवेकाचा अंधार विवेकरुपी प्रकाशाने नाहिसा व्हावा, यासाठी हा दीपोत्सव साजरा केला जातो. भारताचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकापेक्षा जिवंत उत्सवात अधिक आहे. उत्सव खऱ्या अर्थाने जीवन दर्शन आहे.
बाबेल परिवार गेले अकरा वर्षांपासून दरवर्षी जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करीत आहे. यावर्षी कुकडेश्वर येथील शिव मंदिरात रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. कुकडेश्वर मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार आहे. इसवी सन ७५० ते ८५० च्या काळात शीलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराची उंची १५ फूट असून प्रत्येक भिंतीवर सुंदर, रेखीव, कोरीव काम आहे. नाणे घाटात जाताना भाविकांनी नक्कीच मंदिराचे स्थापत्य काम पाहण्यासाठी जावे असे आवाहन प्रा. रतिलाल बाबेल यांनी केले.
दीप मांगल्याचे प्रतीक आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव करणे हा समृद्धी, आनंद, उत्साह व कृतज्ञतेचा उत्सव आहे. बाहेर तर दिवे पेटवायचेच पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. जीवनाच्या वहीचा आढावा घेताना जमेच्या बाजूला विवेकाच्या प्रकाशाने जीवन भरून काढायचे.
जीवन सदैव विवेकाच्या प्रकाशाने उजळून निघावे यासाठी आपली कृती सत्कर्माची ठेवावी. प्रकाश आला की अंधकार जातो. अंधकार गेला की तेथे मांगल्य येते. मी प्रकाशित होईन व दुसऱ्यांनाही प्रकाशित करेन, ही प्रेरणा माणसाने दिव्यापासून घेतली पाहिजे. दिवा अंधारात धडपडणाऱ्याला वाचवितो. प्रकाश देऊन रस्ता दाखवितो.
दिवा लहान असला तरी तो आपणाला सांगतो, हिम्मत दाखव, जळण्याची तयारी ठेव, तू ही जगाला प्रकाश देऊ शकशील. मानवाला प्रेरणा देणाऱ्या दिव्याला नमस्कार करून कृतज्ञ होण्यासाठी दीपोत्सव करण्याची भारतीय परंपरा उज्वल आहे, असे सांगून प्रा. बाबेल यांनी आपल्या संस्कृतीतील दिव्याचे महत्त्व सांगितले.
मारुती महाराज दिवटे यांच्या हस्ते कुकडेश्वराला अभिषेक करण्यात आला. बाबेल ट्रस्टच्या वतीने केलेल्या दीपोत्सवाचे सगळे नियोजन ट्रस्टचे सचिव प्रा. रतिलाल बाबेल आणि सदस्य अक्षदा बाबेल यांनी केले. दिवे प्रज्वलित करण्यासाठी शंकर केंगले, नंदा केंगले, मंजिरी जेजुरकर, अशोक गोरडे यांनी सहकार्य केले.