Bacchu Kadu : मुंबई : मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आणि मराठा नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकीकडे ओबीसी नेत्यांचा एक गट तयार झाला आहे. तर त्याला जोरदार टक्कर देण्यासाठी मराठा समाजाचे नेतेही आता हळूहळू पुढे सरसावत आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. छगन भुजबळ हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त केली नाही, तर राजीनामा द्यावा, असं खुलं आव्हान बच्चू कडूंनी केल आहे.
त्याशिवाय हिंगोलीत झालेल्या ओबीसी मेळाव्यातर बबनराव तायवाडे यांनीही प्रक्षोभक विधान केलं. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, असं ते म्हणाले. बबनराव तायवाडे यांच्या विधानावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमची बुद्धी इतक्या खालच्या पातळीवर गेली असेल तर मी त्याचा निषेध करतो. नेत्यांनी हातपाय कापण्यापर्यंत हा संघर्ष नेऊ नये. हातपाय कापण्याला ताकद लागत नाही. नेत्यांनी हातपाय जोडण्याचं काम केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, “तुम्ही तुमचं आरक्षण शांततेनं मागावं. ओबीसीमध्ये मराठा घुसतोय, असं काहीही नाही. कारण कोकणातला, विदर्भातला मराठा कुणबी झाला. पण चार-पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही. ज्यांचं काहीच राहिलं नाही, त्यांचं जातीच्या नावाने चांगभलं आहे. ते आता नळावरच्या भांडणासारखं भांडायला लागले. याचं मला नवल वाटतंय.” मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करा, या छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “छगन भुजबळ म्हणजे सरकार नाहीत. भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे शिंदे समिती रद्द झाली नाही, तर त्यांनी राजीनामा द्या. एकतर ती समिती रद्द करा नाहीतर मग राजीनामा द्या.”