हिंगोली : छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी जर पक्ष काढला असता, तर महादेव जानकर इथे मुख्यमंत्री म्हणून आला असता. छोट्या लोकांना तिकीट मागायला कशाला जायचं? आम्ही कमांडर आहोत. ओबीसींनी खासदार किंवा आमदार होईल असं ठरवलं पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती लढायच्या नाहीत. असं विधान महादेव जानकर यांनी ओबीसी एल्गार सभेत केलं आहे. (Mahadev Jankar)
अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये रामलीला मैदानावर ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. या महासभेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर यांच्यासह राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.
या सभेत बोलताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाने डिमांडर होण्यापेक्षा कमांडर व्हावे. तसेच या ओबीसी लढ्यामध्ये दलित आणि मुस्लिम यांनासुद्धा सोबत घेऊन सर्वांनी मिळून राजकारणात उतरलं पाहिजे आणि ताकद दाखवून दिली पाहिजे, असं म्हणत मराठा आरक्षणावर टीका केली आहे.
भुजबळ साहेब आम्ही तुमच्यासोबत युती करु
तसेच पुढे बोलताना म्हणाले, भुजबळ साहेब, आम्ही तुमच्यासोबत युती करायला तयार आहोत. मात्र, त्यांच्याबरोबर जाणार नाही. वंजारी, धनगर, माळी या समाजातून आपण पैसा उभा करु शकतो. तुम्ही आमचे माईलस्टोन नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर क्रांती झाली असती. असंही महादेव जानकर यावेळी म्हणाले.(Chhagan Bhujbal)