हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची कामात कसूर केल्याने तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबतचा लेखी आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रमेश चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २३) काढला. वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असली तरी सर्वसामान्य नागरिकांवर योग्य ते आतातरी उपचार होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम यांची फुरसुंगी तर डॉ. रुपाली लोखंडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे व फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे या दोघांची उरुळी कांचन येथील आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारून अहवाल सादर करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. या तडकाफडकी बदलीमुळे उरुळी कांचन परिसरामध्ये ग्रामस्थ, ग्रामपंचायत व पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र नवीन अधिकारी कामाचे कसे नियोजन व जनतेला सहकार्य करतात हे पाहणे गरजेचे आहे.
उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र कायम चर्चेत…
मागील सहा महिन्यापूर्वी पाण्याच्या टाकीत पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. यावेळी त्या बालकाचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉ. सुचिता कदम व डॉ. संदीप सोनावणे यांना वरीष्ठांनी आदेश दिल्यानंतर तब्बल सात तासांनी शवविच्छेदन केले होते. मृतदेहाचे उशिरा शवविच्छेदन झाल्याने या प्रकरणी दोषी असलेल्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तीन वैधकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.
हद्दीच्या बाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन होणार का?..
मागील काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर येथील एका तरुणाने आत्महत्या केली होती. यावेळी मृत तरुणाचे ‘हद्दी’चे कारण देत शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. उरुळी कांचन पोलिस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव ग्रामपंचायतीने केल्याची माहिती कदम यांनी दिली होती. मात्र, सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी असा कोणताही ठराव केला नसल्याची माहिती कांचन यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे हद्दवाद संपून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मृतदेहांचे आतात्तरी शवविच्छेदन होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पूर्व हवेलीतील सोळाहून अधिक गावांसाठी शवविच्छेदन केंद्र..
हवेली तालुक्यात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात नसल्याने रस्ता अपघात, आकस्मिक मृत्यू, रेल्वे अपघात, तसेच संशयास्पद मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयातच जावे लागते. कायदेशीरदृष्ट्या तपासाच्या मुद्द्यावरून शवविच्छेदन ही बाब महत्वाची असते. मात्र, उरुळी कांचन हे पुणे सोलापूर महामार्गावरील सुमारे एक लाख व त्यापेक्षाजास्त लोकसंख्या असणारे उपनगर आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्याचा इशारा देत वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न..
ताम्हणवाडी (ता. दौंड) येथील एका २६ वर्षाच्या तरुणाचा अपघात झाला होता, त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उरुळी कांचन येथे आणले होते. या ठिकाणी कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी रूपाली लोखंडे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे नागरिक व ग्रामस्थ त्रस्त झाले होते. यावेळी वरिष्ठांकडे तक्रार करून प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्याचा इशारा देत वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत उरुळी कांचन मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली.
तात्काळ बदली करून दोन एम.बी.बी.एस डॉक्टर द्या – तानाजी सावंत..
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष आबासाहेब कांचन, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, किशोर मेमाणे, अभिषेक पवार आदींनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची मेमाणे फार्म येथे भेट घेऊन त्यांच्या समोर वस्तुस्थिती मांडली. तानाजी सावंत यांनी कोणताही विलंब न लावता काम टाळणाऱ्या महिला आरोग्य अधिकारी रुपाली लोखंडे यांची बदली करण्याचे आदेश दिले. तसेच उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने दोन डॉक्टर तेही एमबीबीएस शिक्षित देण्याचे आदेश दिले.