सागर जगदाळे
भिगवण : सरपंच पदाच्या झालेल्या संगीत खुर्चीमुळे भिगवण ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादीने आपली सत्ता गमावली व त्यानंतर सत्तेवर भाजप पुरस्कृत विचाराच्या पॅनेलने ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
उपसरपंच पदाचा राजीनामा शीतल शिंदे यांनी दिला असून त्यास महिनापेक्षा जास्त दिवस उलटून गेले असले तरी नवीन उपसरपंच निवडला गेला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकहाती सत्ता असूनही उपसरपंच निवडीला वेळ लागत असल्याने भाजप पुरस्कृत पॅनेलमध्ये सर्वकाही ओके नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
उपसरपंच पदासाठी स्मिता जयदीप जाधव, कपिल भाकरे, सईबाई मच्छिंद्र खडके यांची नावे आघाडीवर असली तरी उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मंगलदृष्टी पाणी योजनेवरून झालेले राजकारण व हर घर जल योजनेच्या श्रेयवादावरून आयतेच भांडवल राष्ट्रवादीच्या हाती लागले होते.
विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा केलेला बालहट्ट सध्यातरी सत्ताधाऱ्यांनी पुरा केला नाही असे एकंदरीत चित्र दिसत आहे. कोणते लॉलीपॉप देऊन ग्रामसभेचे विशेष आयोजन करण्याचा बालहट्ट करणाऱ्यांना शांत केले हा प्रश्न भिगवणकरांना पडला आहे. यावेळेस तरी भिगवणकरांना वाटले की गावचा विकास वेगाने होईल पण राज्यात सत्ता पालट होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली आणि बघितलेले स्वप्न धुळीस मिळाले.
राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने त्यांच्या कालावधीत भरघोस निधी आणलेला तीच कामे सत्तापालटानानंतर सुरू होती अशातच दीड वर्षे निघून गेली. निवडून आलेल्या सदस्यांपैकी उपसरपंच पदासाठी कोणीच पात्र व्यक्ती नाही काय अशी शंका उपसरपंच पदाच्या निवडीला लागत असलेल्या वेळेमुळे निर्माण होयला लागली आहे. किती तो सस्पेन्स म्हणावा लागेल उपसरपंच निवडीचा? उपसरपंच पदासाठी ज्यांनी देव पाण्यात ठेवले आहे त्यांचेही देव या सस्पेन्स मुळे गोंधळात पडले असतील, कधी यातून आपली सुटका होईल म्हणून देवांनीच या संकटातून वाचविण्यासाठी नवस बोलायला सुरुवात केली असेल यात शंका नाही.
ग्रामपंचायत सदस्य सध्या तरी उघड बोलण्यास तयार होत नसले तरी निवडीपर्यत ‘तेरी बी चूप अन मेरी भी चूप’ अशी भूमिका घेऊन वावरत आहे पण जर मात्र मनासारखे घडले नाहीतर मात्र नाराजी नाट्य रंगणार असे ही जाणकार मंडळी बोलत आहे.
दरम्यान, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे वातावरण जरी आलबेल वाटतं असले तरी उपसरपंचपद निवड यातून नाराजीचे नाट्य रंगले तर यातून दुफळी पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता सदस्यांची नाराजी परवडणारी नाही हे ओळखून मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. उपसरपंच निवडीबाबत भिगवणचे सरपंच तानाजी वायसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.