मुंबई: कुटुंबासोबत सुटीवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुटीमध्ये ते कुटुंबासह हॉंगकॉंगच्या ट्रीपवर गेले होते.
मुंबई येथे ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात गेल्या ३४ वर्षांपासून आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीत अनेक वर्षे काम केले. शिवसेनेतील लोक मला ओळखतात. विधीमंडळात २० वर्षांपासून आमचे अनेक मित्र आहे. मंत्री म्हणून काम केलं आहे. मतदारसंघात आम्ही ४-४ वेळा निवडून आलो आहोत, अशा कुठल्या फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही. मोठ्या प्रमाणावर संघर्ष करून ३४ वर्षे ही इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, ज्यांनी कुणी असा प्रयत्न केला असेल त्यांना त्यांचा प्रयत्न लखलाभ असावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कार्य सुरु केल्यापासून आठवड्यातून किंवा महिन्यातून मी घरी जातो. त्यामुळे माझ्या सुनेने व मुलीने तीन दिवसांचा सहकुटुंब पर्यटनासाठी जाण्याचा प्लॅन केला. हाँगकाँग, मकाऊ या पर्यटन स्थळावर आम्ही गेलो. अत्यंत चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनात ज्या पद्धतीने आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला, त्याचे दु:ख झाले.