नवी दिल्ली: राष्ट्रवादीचा शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांची शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाकडून भेट घेण्यात आली आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 4 महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील ती न झाल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतलीआहे. शरद पवार गटाच्या या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांची उपस्थिती होती.
प्रफुल पटेल यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाची आहे. यासंदर्भात खासदार वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून यापूर्वीच आठवण देखील करून देण्यात आली होती. पण, त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने सभापतींची भेट घेतली आहे.