Mumbai Pollution : मुंबई : मुंबईतील प्रदूषण हा सध्या महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक यंत्रणा आणि अधिक मनुष्यबळ वापरा, दिवसाआड रस्ते चकाचक धुऊन काढा, आवश्यकता भासल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील मुख्य रस्ते व वसाहतींमधील रस्ते एक दिवसआड धुऊन काढा असे आदेश कर्माचाऱ्यांना देण्यात आले आहेत. आधुनिक यंत्रणा, अधिकचे मनुष्यबळ आणि भाडेतत्त्वावरील एक हजार टँकरमधील पाण्याचा वापर करून मेट्रो, बुलेट ट्रेन, पूल उभारणी आदी विकासकामांच्या ठिकाणी फॉगर मशीन, स्प्रिंकलर आदींचा वापर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पहाटे पाच वाजता आढावा
पालिकेने केलेल्या कामाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पहाटे पाच वाजता आढावा घेतला. पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सब-वे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यापुढे प्रत्येक विभागात भेट देऊन पालिकेकडून करण्यात येत असलेल्या स्वच्छता कामांची पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन
हवेतील धूलीकण कमी करण्यासाठी शहरात ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. मुंबईत मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेनची कामेही सुरू आहेत. तसेच पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी निर्माण होणारे धुळीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिका, शासकीय यंत्रणा आणि विकसक यांनी उपाययोजना करावी. ग्रीन कव्हर लावा. स्प्रिंकलरचा वापर करा. त्यामुळे धुळीवर नियंत्रण येईल व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत. त्याशिवाय, मुंबईतील मुख्य रस्ते व मोठ्या वसाहतींमधील रस्ते अगोदर धूळ हटवूननंतर टँकरमधील पाण्याचा वापर करून स्वच्छ करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.