राजू देवडे
लोणी धामणी(पुणे) : ऊस पिकावर ड्रोन मशीनद्वारे फवारणी करण्याची संकल्पना आता पुढे आली आहे. वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शिवाजी सावकार पोखरकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. उसावर पडलेला लोकरी मावाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी केली आहे.
एका एकरावर मजुरांच्या साहाय्याने औषध फवारणीसाठी साधारण तीन तास लागतात. मात्र, ड्रोनद्वारे फवारणीसाठी केवळ आठ मिनिटे लागतात. त्यामुळे एका तासात सहा ते सात एकर पिकांवर फवारणी करण्यात येत असल्याचे पोखरकर यांनी सांगितले.
मजुराद्वारे एक एकरवर औषध फवारणीसाठी साधारणपणे २० लिटर औषध लागते. ड्रोनद्वारे १० लिटरमध्ये एक एकर पिकावर फवारणी होते. त्यात नऊ लिटर पाणी व एक लिटर औषध मिसळून फवारणी करण्यात येते. औषध कमी लागत असल्याने पैशांची बचत होत आहे. शिवाय मजुरांवरील खर्चही कमी होत आहे, असे शेतकरी पोखरकर यांनी सांगितले.
शेतीवर योग्य ती औषधांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर उपयुक्त आहे. अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते. शिवाय बांधावर थांबून सर्व शेतीत औषधांची फवारणी करता येते.
– शिवाजी पोखरकर, ऊस उत्पादक, लाखणगाव