Pune Crime News : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणाने पुणे शहर हादरून गेलं होत. या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तरुणीवर वार करणाऱ्या तरुणावर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०) असं आरोपीचं नाव असून याच्याविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
काही दिवसापूर्वी शंतनूने एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतील पेरुगेट चौकीजवळ महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा पाठलाग करत त्याने तिच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत तरुणी जखमी झाली होती. घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने शंतनूचा जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच्या वर्तनात काही सुधारणा होईल अशी आशा होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील विधेचं माहेरघर असलेल्या सदाशिव पेठेतील पेरू गेट परिसरात जून महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. पेरू गेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना शंतनू जाधव या आरोपीने त्यांना थांबवले. तो त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु तिने बोलण्यास नकार दिल्यामुळे त्याने सरळ कोयता काढला. त्यानंतर ती तरुणी धावू लागली. शंतनू तिच्यामागे कोयता घेऊन धावत असताना तिच्यावर त्याने कोयत्याने हल्ला केला. यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या दोन तरुणांनी धाव घेत तरुणीचा जीव वाचवला होता. या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला होता.