पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेऊन, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची खराडी येथे सभा होत आहे. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली परिसरात ही सभा होणार आहे. येथे जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
देहू, आळंदी येथील सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडी भागात सभा होत आहे. यानिमित्त पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. आज दिवसभर नगर रस्त्यावर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी घातली आहे. नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या दिशेने वळवली आहेत.
दरम्यान, हा रस्ता वर्दळीचा असल्याने येथून जाणाऱ्या जड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हडपसर-सासवडकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रस्ता मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तर शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण-भोसरी मार्ग वापरत पुणे-मुंबईकडे जाणार आहेत. तर खराडी बायपासवरून जुना पुणे-मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात जाणार आहेत.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात देखील मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र बॅनरबाजी करण्यात येत आहे. ‘आवाज मराठ्यांचा, साथ जनमानसांची’, ‘एक मिशन मराठा आरक्षण’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा आशयाचे बॅनर शहरात लागले आहेत. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कल्याण पूर्व येथील कुठे मैदानात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.
या मैदानाची क्षमता २० हजार लोकांची असून, आठ सेक्टर केले आहेत. याठिकाणी सहा एलईडी स्क्रीन लावली जाणार आहे. रस्त्यावर फुलांचा सडा टाकून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बाईक रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.