पुणे : प्रसिद्ध लेखक आणि वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर सतत टीका करत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
दरम्यान, नवी पेठेतील पत्रकार भवनासमोर शनिवारी सायंकाळी तोंडाला काळं फासल्याची घटना घडली होती. याबाबत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालयामध्ये शनिवारी दुपारी नामदेव जाधव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. मात्र, सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर जाधव सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील पत्रकार भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले होते.
त्यावेळी माध्यमांशी बोलत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत काळं फासलं. मात्र पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला केले. तेथून जाधव विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली.