Prakash Shendge on OBC Reservation : छत्रपती संभाजीनगर : ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कराल तर महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे, असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदत घेतली. सरसकट कुणबी दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घुसवा, याला टोकाचा विरोध करणार आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्यायकारी
मराठा समाजाची सुरू असलेली आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी आहेत, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. आंदोलनामुळे आज सामाजिक विभाजन सुरू आहे. मराठा ओबीसी समाजातील सुरू असलेला वाद मिटलेला नाही. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी एल्गार मेळावे, मोर्चे काढण्यात येत आहेत. शांततेने, लोकशाहीच्या मार्गाने ओबीसी समाजाचे आंदोलन असेल, असेही प्रकाश शेंडगे म्हणाले. येत्या २६ रोजी हिंगोलीत एल्गार मेळावा होत आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात मेळावे होणार आहेत.
हिंगोलीतील पटोले, बावनकुळेंना निमंत्रण
हिंगोली येथे २६ नोव्हेंबर रोजी एल्गार मेळावा होणार आहे. हिंगोलीचा मेळावा अधिक मोठा होईल. राज्यातील सर्व पक्षातील नेते उपस्थित राहणार असून, या एल्गार मेळाव्यात उपस्थित राहावे यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निमंत्रण दिले आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.