World Cup Final 2023 : पुणे : विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे. ही फायनल मॅच रंगत करण्यासाठी भारताकडून जय्यत तयारी सुरु आहे. हा सामना पाहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची आधी चर्चा होती. मात्र, आता पंतप्रधान मोदी येणार हे नक्की झालं आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
सेमी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर गुरुवारी ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यामुळे आता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. या सामन्याचा थरार वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
ऑस्ट्रेलियन टीम सर्वाधिक आठव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. तर टीम इंडिया चौथ्यांदा अंतिम फेरीमध्ये दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आत्तापर्यंत पाचवेळा तर भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. हवाईदलाच्या गुजरातमधील जनसंपर्क अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. सूर्यकिरण टीम नऊ जेट विमानाद्वारे हवाई कसरती करणार आहे. यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींचा आनंद क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. यंदा विश्वकरंडक सुरु होण्यापूर्वी कोणताही उद्धघाटन कार्यक्रम झाला नव्हता. परंतु आता अंतिम सामन्यापूर्वी हवाईदलाचा कार्यक्रम होणार आहे. सामन्यापूर्वी पॉप सिंगर दुआ लीपा आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी गायक अरजीत सिंह, सुनिधी चौहर, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह यांचा गाण्यांचा कार्यक्रम झाला होता.