मुंबई : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद आता उघड झाला आहे. मराठा आरक्षणावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मंत्री छगन भुजबळही या मागणीसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी जालना येथे झालेल्या सभेत भुजबळ यांनी आक्रमक भाषण करत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना टार्गेट केले. त्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी भुजबळांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
संभाजी राजे छत्रपती ट्विट करत भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यांनी आपापल्या ट्विटमध्ये म्हटले की, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. त्यामुळे सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, असं देखील संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.