Zika Virus in Pandharpur : पंढरपूर : देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. झिका व्हायरसचा राज्यातला दुसरा रूग्ण आढळला आहे. पुण्यानंतर आता पंढरपुरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टराला झिकाची लागण
मुंबईवरून एक महिन्यापूर्वी आलेल्या डॉक्टरला पंढरपूरमध्ये पोहचल्यावर त्रास जाणवू लागला होता. त्याला पुणे येथे जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या डॉक्टरची झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लागण मुंबईत झाली आणि उपचार पुण्यात सुरू आहेत. त्यांची तब्येत आता चांगली आहे. मात्र, पंढरपूरमध्ये सगळीकडे तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पंढरपूरमध्ये एकही झिका व्हायरस रुग्ण सापडलेला नव्हता.
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत. प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी सुरू केली. बाधीत परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून चार जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकं दुखी आणि मळमळणे अशी झिका आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतात.