पुणे : वाढत्या धुलिकणांमुळे पुण्यासह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे पुण्यात ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि १ एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावेत. धूलिकण रोखण्यासाठी स्माॅग गण वाॅटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्यावेळी करावा, अशा मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी तसेच रेडिमिक्स प्लान्टभोवती पत्रे उभारणे आणि हिरवे आच्छादन टाकणे बंधनकारक असतानाही मेट्रो प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिला आहे.
पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या ठिकाणी किमान २० फूट बॅरिकेडिंग असणार आहे. राडारोडा टाकल्यास वाहने जप्त केली जाणार असल्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या ढासळत्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त करताना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका प्रशासनाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मेट्रोचे काम करताना होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, महामेट्रोकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्वारगेट येथील जेधे चौकात मेट्रो हब आणि बहुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या चौकात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषण होत असते. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांट असून खडी, सिमेंट वाहून आणणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
मेट्रोकडून येथे नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार प्रदूषण रोखण्यासाठी पत्रे लावणे आणि हिरव्या रंगाचे अच्छादन टाकणे बंधनकारक आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याची तक्रार महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसांच्या आता प्रदूषण रोखण्यासाठीच्या ठोस उपाययोजना करा अन्यथा काम बंद करावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.