पंढरपूर : “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) रणशिंग फुंकलं आहे. खासदार शरद पवार आज सोलापूरमधील माढा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार माढ्यात दाखल झाले. माढ्यातील कापसेवाडी येथे कृषी निष्ठ परिवाराच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला, त्याला पवारांनी उपस्थिती लावली.या मेळाव्या आधी शरद पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील लोकसभेच्या 48 जागांबाबत जागा वाटप बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, उरलेल्या जगांचाही निर्णय आता दिवाळीनंतर होईल, असं शरद पवार म्हणाले.
हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येतील असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले होते. याबाबत शरद पवारांना विचारण्यात आले असता पवार म्हणाले, ” मी हे सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात (अमळनेर, जळगाव) मी जाऊन आलो आहे. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची सर्वजण आम्ही काळजी घेऊ”
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवरही भाष्य केलं. पवार म्हणाले, “राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन पूर्ण वेगळे आहे. आमच्या घराची जुनी पद्धत आहे, कुठेही असलो तरी, दिवाळीत एकत्र येतो”