Zika Virus : पुणे : कोरोनाच्या संकटानंतर पुण्यातील वाढते हवाप्रदूषण, ध्वनीप्रदूषण यामुळे पुणेकरांचे आरोग्य बिघडत असतानाच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. पुणेकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण डेंगू, मलेरियापेक्षाही घातक असलेला झिकाचा पहिला रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये सापडला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून, आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याची गंभीर दखल आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. या महिलेला ५ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. यावेळी तिच्या रक्ताचे नमुने १० नोव्हेंबरला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एन.आय.व्ही.) पाठवण्यात आले. तिचा तपासणी अहवाल ११ नोव्हेंबर रोजी झिका पॉझिटीव्ह आला. या महिलेने काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला पुण्यातील खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तपासणीत झिकाचे निदान झाले. दरम्यान, पिंपरी- चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाल्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी वर्तवली आहे.
बुधवारी (दि १५) साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी येरवडा येथे बाधित रुग्ण आढळलेल्या प्रतिक नगर येथे जात रुग्णाची भेट घेतली. तसेच तब्येतीची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. या सोबतच पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश देखील दिले आहेत. सध्या झिका बाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील ५ जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र, अन्य कोणालाही या आजाराची लक्षणे नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली.
सारणीकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत झिकाचे १० रुग्ण आढळले आहे. त्यांना गंभीर आजार नव्हता. झिकाचा धोका हा गर्भवती महिलांना जास्त असतो. दरम्यान, तपासणी पथकाने संबंधित महिलेच्या घराची तपासणी केली असता, महिलेच्या घरातील फ्लॉवरपॉटमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. अळ्या आणि अंड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत, असे राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.
झिका हा आजार कशामुळे होतो?
झिका विषाणू प्रामुख्याने संक्रमित एडीस प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो. झिका विषाणू रोग सामान्यतः सौम्य आहे. जर रुग्णाची प्रकृती ही गंभीर होण्याआधी त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.
येरवड्यात झिकाचा रुग्ण आढळला आहे. रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही खबरदारी म्हणून रुग्णाच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.
– डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग