Trekking Shoes Guide: पुणे : अनेकजण आता ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करत असतात. मग कपड्यांपासून ते कॅप, शूजपर्यंत सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो. पण ट्रेकिंग करताना शूज चांगलाच असावा. जेव्हा शूज निवडत असाल तेव्हा ट्रेकिंगसाठी किती वेळा जाणार, किती अंतर जाणार यावरून कशा प्रकारचे शूज घ्यावे हे निश्चित करावे.
पायाच्या तळव्याला व्यवस्थित आधार मिळेल असे शूज घालावेत. त्याला हायकिंग सँडल्सही म्हटले जाते. विशेषतः पाठीवर जर जास्त वजन असलेले बॅकपॅक नेणार असाल किंवा जर खूप अंतर किंवा चढ-उतार असलेल्या वाटांवर चालणार असाल तर उत्तम सपोर्ट देणारे शूज महत्वाचे असतात. शूजचे सोल किंवा तळ कसा असावा हे तुम्ही किती दूरवर ट्रेकला जाणार आहात यावर अवलंबून असते. मेरील, हाय टेक, मॅड रॉक इत्यादी कंपन्यांचे शूज खास ट्रेकिंगसाठी बनवलेले असतात.
माउंटेनियरिंग बूट्स हे कडे-कपाऱ्यांमध्ये ट्रेकिंग करणार असाल तरच घ्यावे. ओल्या, खडकाळ वाटांवर अनेक दिवसांचा ट्रेक असल्यास हे शूज उत्तम मानले जातात. जर ट्रेक अगदी जवळचा असेल आणि रस्ता सरळ सोपा असेल तर लवचिक सोल असलेले शूज वापरा. मात्र, जर ट्रेक लांबचा असेल आणि जास्त चढ-उतार असतील तर जाड आणि मजबूत सोलचे शूज वापरणे चांगले ठरते.