मुंबई : अभिनेता अजय देवगण याने करिअरच्या सुरुवातीपासूनच अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याच्या सिनेमांना इतकं यश मिळतंय की बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई होत आहे. अजय देवगण (Ajay Devgn) याच्या ‘जिगर’ या सिनेमाने 1992 मध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.
या सिनेमातील अजयचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना खूपच आवडला होता. या सिनेमातील त्याचा जुना सहकलाकार आणि अजय देवगण पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 1992 मध्ये रिलीज झालेल्या ‘जिगर’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. अजय देवगणच्या या चित्रपटातही अशाच एका अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका होती. ज्याला पुढे ‘महाभारत’मधून घरोघरी ओळख मिळाली.
आता 31 वर्षांनंतर हाच अभिनेता अजय देवगणसोबत पुन्हा अॅक्शन चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या नकारात्मक खलनायकाच्या भूमिकेतही चांगली छाप पाडणाऱ्या अभिनेता फिरोज खान आणि अजय देवगण हे दोघे एकाच सिनेमात दिसणार आहेत.
फिरोज खान याने ‘महाभारता’त अर्जुनची भूमिका साकारली होती. आता फिरोज खान अजय देवगणसोबत पुन्हा 31 वर्षांनी स्क्रीनवर दिसणार आहे. याबाबत फिरोजने सांगितले की, ”मी अजयसोबत एका उत्तम अॅक्शन सिनेमात काम करत आहे. सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी मात्र रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. या सिनेमातही मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे”.