नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या विरुद्ध अद्वय हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
यावर्षी एप्रिल महिन्यात हिरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची नाशिक जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. जाधव यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, जिल्हा बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहे. तसेच न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 31 कोटी 40 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज उलल्याचा आरोप आहे.