जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी नऊ दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. आता प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आजपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वाशी येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जरांगे पाटील यांच्यावर माळी समाजाच्या वतीने १०० जेसीबीतून फुलांची उधळण करणार आहेत. तर त्यांना १ टनाचा हार घातला जाणार आहे.(Manoj Jarange)
मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्याचा दौरा नऊ दिवसांचा असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या गाठी-भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून दौऱ्यावर निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ओबीसीकडून त्यांचा सत्कार होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी व त्यानंतर परांडा येथे सभा होणार आहे.
माळी समाजाकडून जरांगे पाटील यांचा सन्मान होणार असल्याने ओबीसी नेत्यांसाठी धक्का समजला जात आहे. सरसकट आरक्षणाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा विरोध आहे. याविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील हे गावागावातील ओबीसी समाजाचा मला पाठिंबा असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, माळी समाजाकडून होत असलेल्या भव्य सत्काराच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मतावर शिक्कामोर्तब होत आहे.
दरम्यान, सध्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार चर्चा होत आहे. सभेच्या ठिकाणी रांगोळी व बॅनर लावले आहेत. वाशी शहरात मंत्री, आमदार, नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी निघालोय. मराठा आरक्षण मिळणार हे नक्की आहे. लेकराबाळांचे कल्याण होणार, हा विश्वास आता समाजाला वाटत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.