Thane Crime ठाणे : ठाणे जिल्ह्याला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरात एका महिलेवर अत्याचार झाला आहे. रेल्वे रुळावरून घरी पायी जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशाल चव्हाण नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सोमवार, 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित तरुणी ही शहाड येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेनने टिटवाळा स्टेशनवर पोहोचली. स्टेशनपासून तिचे घर जवळच असल्याने ती घराच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत होती. त्याचवेळी ती पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. आरोपीने संधी मिळताच महिलेला बळजबरीने रेल्वे ट्रॅकजवळील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी गुन्हा करून पळून गेला.
घडलेला सर्व प्रसंग या पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही पोलिसात येऊन या संदर्भात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी विशालला अवघ्या काही तासात अटक केली. परंतु, ही घटना रेल्वेच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करत आरोपीला देखील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल चव्हाण हा पडघा येथील एका खासगी कंपनीत काम करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Thane Crime)