जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एरंडोल शहरातील नगरपालिकेच्या बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १३ नोव्हेंबरला संध्याकाळी घडली. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा. हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) असे मयत बालकाचे नाव आहे.
ठेकेदार आणि नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याचा कुटुंबियांकडून केला जात आहे. या घटनेनंतर एरंडोल पोलिस ठाण्यात नगरपालिकेचे अभियंता आणि ठेकेदार या दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एरंडोल शहरात जुना धरणगाव रस्ता परिसरात विशाल रविंद्र गायकवाड हा आई-वडील आणि लहान भाऊ-बहीण यांच्यासोबत राहत होता. हातमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु असून लोखंडी गज उघड्यावर ठेवलेल्या होत्या. विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो खाली पडल्याने ढाप्यावरील एक लोखंडी गज त्याच्या छातीत घुसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुटुंबीयांचा आक्रोश
या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. ही घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने तसेच भिल्ल समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत संबंधित दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पावित्राही घेण्यात आला होता.