मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाचे जोरदार फटाके वाजू लागले आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षातील खासदार गजानन कीर्तीकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गजाभाऊंना आता डॉक्टरांचीच गरज आहे, असं वक्तव्य कदम यांनी केले आहे.
मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच खासदार गजानन कीर्तीकर यांनी पत्रक काढून रामदास कदम यांच्या गद्दारीचे पाढेच वाचले आहेत. यावर आता कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. किर्तीकर यांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, खरंतर किर्तीकर हे शिवसेना पक्षासोबत गद्दारी करत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडील आणि मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपल्या खासदारकीचा निधी मुलाला विकास कामे करण्यासाठी देत आहेत. मला बदनाम करण्याचे काम आमच्या पक्षातील एक ज्येष्ठ नेता करत असल्याचे कदम यांनी म्हटले. गजानन कीर्तीकर यांच्या रक्तात भेसळ झाली असल्याची बोचरी टीका कदम यांनी केली.
तसेच गजाभाऊंचे आता वय झालेय त्यांना डॉक्टरांची गरज आहे. पक्षाच्या नेत्याविरुद्ध बोलण्याअगोदर त्यांनी पक्ष प्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र, कीर्तिकर यांनी थेट निवेदन जारी करत बेछुट आरोप केले आहेत. त्यात कीर्तिकारांनी म्हटले आहे की, 1990 मध्ये पाडण्याचा आदेश कदमांनी दिला. त्यावेळी मी कांदिवलीमध्ये फक्त एक शाखाप्रमुख होतो. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी मला खेड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. केशव भोसले यांच्यासोबत माझी लढत होती. भोसले यांना दाऊदचा पाठिंबा होता. त्यावेळी दाऊद भारतातून बाहेर पळून गेला नव्हता. माझी लढत ही दाऊद बरोबर होती. माझा संघर्ष तिकडं खेडमध्ये असताना गजाभाऊंना पाडायला मालाडमध्ये कशासाठीयेऊ, असा उलट प्रश्न रामदास कदम यांनी केला.
कीर्तीकर-कदम वाद काय?
गजानन कीर्तीकर हे मुंबईच्या उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांनी या मतदारसंघावर आपल्या मुलासाठी दावा केला आहे. खासदार गजानन कीर्तीकर यांचे वय झाल्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे शिवसेना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून तेच उमेदवार असणार आहेत. तर, रामदास कदम हे मुलगा सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. खासदार कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रत्यारोप केले होते. गद्दार कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा ही हास्यास्पद आहे, अशी टीका कीर्तिकरांनी केली होती.