Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क : आपण निरोगी असावं सगळ्यांनाच वाटत असतं. पण काही केल्या आजारपण येत असतो. त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे बनले आहे. त्यापैकी फिट हा त्रास आहे. फिट येणे हा तसा पाहिला तर एकप्रकारचा आजार आहे. पण त्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. जर कोणाला अचानक फिट आली तर काय करावं, काय नको हे अनेकांना माहिती नसते. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला फिट येत असेल तर त्याला लगेचच डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपवावं. जेणेकरून त्याच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल. रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर कराव्यात. रुग्णाच्या डोक्याखाली मऊ उशी द्यावी, असे केल्याने संबंधित व्यक्तीला आराम मिळू शकेल. पण हे करत असताना रुग्णाला काहीही प्यायला देऊ नये.
याशिवाय, जर रुग्णाने घट्ट कपडे घातले असतील तर त्याचे कपडे सैल करावेत. संबंधित व्यक्तीचे तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नये, असे केल्यास रुग्णाला इजा होऊ शकते. साधारणतः फिट ही दोन किंवा तीन मिनिटं राहते. त्यानंतर व्यक्ती झोपतो. पण ही फिट पाच मिनिटं राहिल्यास रुग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे.
औषधोपचार घेतल्यास मिळू शकते नियंत्रण
नियमित औषधोपचार घेतल्यास फिट्स येण्यावर नियंत्रण मिळवून व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकतं. आपल्याकडे अजूनही या फिट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. फिट येण्यावर वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.