पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना थेरगाव (पिंपरी-चिंचवड) येथे उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विकास सतिश गायकवाड (वय-३२ रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर प्रकार हा १ डिसेबंर २०२१ ते २२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गायकवाड हा रिक्षा चालक आहे. आरोपी आणि तक्रारदार महिला एकाच परिसरात राहत आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून अल्पवयीन मुलगी आठ महिन्याची गरोदर राहिली. त्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (ता.१३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात आयपीसी 376, 376(2)(एन), 376 (3) लैंगिक अपराधापासुन बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.