योगेश पडवळ
पाबळ : शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त १२ गावांना शेतीसाठी कायमस्वरूपी धरणाचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्या निर्णयानुसार १२ गावांतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून बेल्हे-जेजुरी महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) पाबळ येथे मुख्य चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. प्रशासनाने दखल न घेतल्यास पुढील काळात पुणे-नगर महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
शिरूर तालुक्यातील पाबळ, धामारी, केंदूर, कान्हूर मेसाई, डफळापूर, खैरेनगर, वरुडे, खैरेवाडी, चिंचोली मोराची, मिडगुलवाडी, हिवरे, शास्ताबाद, लाखेवाडी (मलठण) यांसह अन्य गावांना जवळपास दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी अनेकवेळा बैठका, आंदोलने झाली. लोकप्रतिनिधींनी मोठ मोठी आश्वासने दिली. मात्र, पाणीप्रश्न अद्याप सुटला नाही. पुन्हा एकदा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १२ गावांनी एकत्र येत कान्हूर मेसाई, केंदूर, धामारी, पाबळ याठिकाणी बैठका घेतल्या.
प्रत्येक गावांतील ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्रव्यवहार केले. त्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील व दुष्काळग्रस्त गावांतील शेतकरी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, अद्याप पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोणीही ठोस भूमिका घेतली नसल्याने पाणी हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली १२ गावांतील शेतकऱ्यांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर पाबळ येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास २१ नोव्हेंबरपासून केंदूर येथे साखळी उपोषण व १ डिसेंबरपासून कान्हूर मेसाई येथील मेसाई देवीच्या मंदिरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय या वेळी जाहीर केला. या वेळी सचिन वाबळे, सोपान जाधव, दादा खर्डे, विकास गायकवाड, रघुनाथ शिंदे, शांताराम चौधरी, भरत साकोरे, सनी थिटे, संपत कापरे आदींनी मनोगते व्यक्त केली.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.