युनूस तांबोळी
शिरुर(पुणे) : शिरूर येथील अंबिका हॉटेलच्या मागील डोंगरावरील झाडांना पाणी देण्यासाठी ठेवण्यात आलेली २२ हजार ५०० रुपये किमतीची पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सहयाद्री देवराई, शिरुर येथील समन्वयक महिबूब सय्यद यांनी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावर अंबिका हॉटेलच्या मागील वनखात्याच्या डोंगरावर असलेल्या सह्याद्री देवराई शिरुर येथे लोकसहभागातून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मागर्दर्शनाखालील सह्याद्री देवराई या संस्थेच्यावतीने आंबा, चिंच, नारळ, आवळा, जांभूळ या फळझाडांखेरीज अन्य १००० हून आधिक झाडे लावून, त्यांचे जतन व संवर्धन केले जाते. या डोंगरावर झाडांचे मोठे बन उभे राहत आहे. लोकसहभागातून या डोंगरावर झाडांना पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन यंत्रणा करण्यात आली असून, यासाठी दोन पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत.
पाण्याअभावी झाडांची होळी होईल : सयाजी शिंदे
सह्याद्री देवराईचे प्रमुख सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी, शिरुर देवराई येथील पाण्याची टाकी चोरीला गेल्याच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करुन, लोकसहभागातून लोकांसाठी सुरु असलेल्या उपक्रमामध्ये चोरीसारखी घटना घडते, याबद्दल चिंता व्यक्त केली. झाडांचे जतन व संवर्धन करुन पर्यावरण संवर्धनाची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. पाण्याची टाकी चोरीला गेल्यामुळे एकीकडे दिवाळी साजरी होत असताना, पाण्याअभावी झाडांची मात्र होळी होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.