बीड: प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर खूप सारं साध्य करता येत असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय ऊसतोड मजुराच्या मुलाच्या यशावरून येत आहे. ऊसतोड मजुराचा मुलगा अथक मेहनत, परिश्रम घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण झाला. नुकत्याच झालेल्या परीक्षेत सोळावा येण्याचा मान त्याने मिळवला.
संतोष अजिनाथ खाडे असे मुलाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील त्यांचं वास्तव्य आहे. संतोष खाडे यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत सोळावा क्रमांक मिळवला. एका ऊसतोड मजुराचा मुलगा अधिकारी बनणार असल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संतोष खाडे यांचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. त्यांचा मुलगा सरकारी अधिकारी बनल्याने यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.
संतोष खाडे यांचं बालपण गावातील खाडे वस्तीवर गेलं. घरची आणि शेतातली कामं करत संतोषनं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. पुढे भगवान महाराज विद्यालय येथून त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण बलभीम महाविद्यालय बीडमधून इतिहास या विषयातून पूर्ण केलं.
आई-वडिलांच्या हातातील कोयता टाकण्याचा प्रयत्न
2017 पासून पदवीसोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे दोन्हीही चालू ठेवलं. 2019 ला माझी पदवी पूर्ण झाली. त्यानंतर मग मी फुल टाईम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला. शिवाय केवळ अभ्यासाच्या जोरावर इथं अधिकारी होता येतं आणि या माध्यमातून आई-वडिलांच्या हातातील कोयता खाली टाकता येईल, हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.