ठाणे : मी खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण येथील पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि समोर या, मग दाखवतो असं थेट आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे याना दिले आहे.
पोलिसांनी आज या चोरांचं रक्षण केलं, पण या चोरांनी मधमाशीच्या पोळाला डिवचलं आहे, यांना आता फोडल्याशिवाय राहणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या चोरांचे डिपॉजिट जप्त करा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
या लोकांना सत्तेचा माज आला असून त्यांनी बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा पाडली. खरा बुलडोजर काय असतो हे यांना दाखवण्यासाठी मी आलो होतो. पण पोलिसांनी त्यांचे संरक्षण केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंब्र्याची ही शाखा आपलीच आहे, त्याची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत. आज त्यांनी भाड्याची माणसं आणून या बॅरिकेट्सच्या मागे उभी केली, पण मर्दाची औलाद असाल तर समोर या, आमची तयारी आहे असं आवाहनही ठाकरे केलं. ही शाखा आपल्याकडेच राहणार असून त्या ठिकाणी रोज शिवसैनिकच उभा राहणार असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या ठिकाणी भेटीसाठी आले होते. उद्धव ठाकरे हे या शाखेपासून अवघ्या 20 मीटरच्या अंतरावर होते. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी या शाखेपाशी येऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं. त्यानंतर बऱ्याच वेळेनंतर उद्धव ठाकरे मागे फिरले आणि नंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.