Lalit Patil : पुणे : ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. लठ्ठपणाचा आजारही त्याला दाखवण्यात आला होता. परंतु त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये न नेता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर उपचार करत होते.
ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली आहे. मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात नऊ महिने ससून रुग्णालयात विविध उपचाराच्या नावाखाली तो राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता. पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. या दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला कोठडीत घेतले. आता पुणे पोलिसांच्या कोठडीत त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत आहे. त्याच्यावर कोठडीतच उपाचार केले जात आहे.
संजीव ठाकूरच्या नार्को टेस्टची मागणी
ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना निलंबित केले. मात्र, ही कारवाई म्हणजे नाटक आहे. संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. सरकार संजीव ठाकूरला वाचवण्याचे काम सरकार करत आहे. त्यांच्यावर मोक्का कारवाई करायला हवी. तसेच सरकार या प्रकरणात लोकांना वेड्यात काढत आहे. या प्रकरणात ज्यांनी, ज्यांनी पैसे घेतले आहेत, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आमदार धंगेकर यांनी म्हटले.