Global Warming News : पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमानवाढीवर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका, युरोपीयन देश, आखाती देश आफ्रिकन देश सगळे त्यासाठी काम करत आहेत. मात्र अद्यापही जागतिक तापमानवाढीवर काहीत परिणाम निघालेला नाही. त्या उलट स्थिती दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार अत्यंत कमी लोकसंख्येकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे चटके वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात बसू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून गेले १२ महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण १२ महिने होते.
‘क्लायमेट रीसर्च’या संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. यानुसार, नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ हा कालखंड पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेल्या तापमानातील सर्वात उष्ण तापमानाचा काळ होता. कोळसा, नैसर्गिक वायू, इतर इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढू लागलं आहे.
तापमान वाढलं, काय दिसतायत लक्षणं?
१. प्रमाणाबाहेर तापमान वाढल्यामुळे पावसाचं गणित विस्कळीत झालं आहे. कारण उष्ण तापमानात हवेतील बाष्प जास्त प्रमाणात धरून ठेवलं जातं. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा अनेकदा वादळाची स्थितीही निर्माण होते. आफ्रिकेतील अशाच स्टॉर्म डॅनियलनं किमान ४ ते ११ हजार लोकांचे बळी घेतले आहेत.
२. भारतात १.२ बिलियन लोकसंख्या अर्थात जवळपास ८६ टक्के लोकसंख्येला वर्षभरात किमान ३० दिवस तरी जागतिक सरासरीपेक्षा तीन पट अधिक तापमानाचा अनुभव आला.
३. ब्राझीलमध्ये दुष्काळात नद्या इतिहासात कधीच नव्हत्या इतक्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिक स्वच्छ ताजं पाणी आणि अन्नापासून वंचित राहू लागले आहेत.
४. अमेरिकेत या वर्षभरात ३८३ लोकांचा हवामानातील जीवघेण्या बदलांमुळे मृत्यू झाला. त्यातले ९३ मृत्यू हे एकट्या माऊई वणव्यामुळे (अमेरिकेतील शंभर वर्षांतला सर्वात भीषण वणवा) झाले.
५. कॅनडामध्ये दर २०० लोकांमध्ये एका व्यक्तीने वणव्यामुळे आपलं घर सोडलं आहे. अधिक काळ चालणाऱ्या उष्ण वातावरणामुळे हे वणवे दीर्घकाळ पेटते राहतात.
६. जमैकामध्ये गेल्या १२ महिन्यांत सरासरी जागतिक तापमानापेक्षा किमान चार पट अधिक उष्ण वातावरण अनुभवायला मिळालं. त्यामुळे देशात जागतिक तापमानवाढीचे सर्वाधिक परिणाम जाणवू लागले आहेत.