पुणे : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती १ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे प्रकल्प संचालक यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
‘स्विफ्टचॅट’ या उपयोजनाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यासाठी अटेन्डन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.
राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी स्विफ्टचॅट उपयोजन डाऊनलोड करून त्या उपयोजनावरील ॲटेन्डन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेन्डन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदवता येईल. उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा युडायस क्रमांक आणि स्वत:च्या शालार्थ क्रमांकाचा वापर करावा. शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाइल क्रमांक वापरावा. मोबाइल क्रमांक बदलला असल्यास तो शालार्थ संकेतस्थळावर अद्ययावत करणे गरजेचे आहे. सेवार्थ आणि इतर प्रणालीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी बारा, तर शाळांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेडन्स बॉटवर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या संबंधाने राज्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या चॅटबॉटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियमितपणे आढावा घेणार आहे. शिक्षकांनी गुगल प्ले स्टोरवरून संबंधित अॅप डाऊनलोड करावयाचे आहेत. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदवताना शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी.
दरम्यान, विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना अडचणी येत असल्यास शालार्थ संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, युडायस या सर्व संकेतस्थळातील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळावरील अडचणी दूर झाल्यावर इतर अडचणीही दूर होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अडचणी लिंकवर नोंदविणे शक्य…
चॅटबॉटवर दोन सत्रांत भरणार्या शाळांसाठी सकाळी ७ ते दुपारी १२ तर अन्य शाळांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करणे गरजेचे आहे. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती चॅटबॉटवर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणार्या अडचणी लिंकवर नोंदविता येणार आहे.