नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बऱ्याच काळापासून देशातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्याचे काम करत आहे. संघाने उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, उद्दिष्टाच्या दिशेने पाऊल म्हणून देशभरात ५ नवीन विद्यापीठे सुरु करण्याचा निर्णय देखील झाला. आता संघाच्या स्वयंसेवक प्रशिक्षण प्रणालीत मोठे बदल होणार आहेत. संघाने ‘संघ शिक्षा वर्गा’ची प्रणाली आणि त्याचा अभ्यासक्रम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
संघात ध्येयनिष्ठ, संघटननिष्ठ कार्यकर्ते घडविले जातात. संघाची दैनंदिन पातळीवर होणारी शाखा आणि विशिष्ट स्वरूपात घेतले जाणारे स्वयंसेवकांचे प्रशिक्षण वर्ग, यामुळेच हे शक्य होते. संघात या प्रशिक्षण वर्गाना ‘संघ शिक्षा वर्ग’ म्हणतात. संघाच्या स्थापनेच्या २ वर्षांनंतर म्हणजेच, १९२७ पासून संघ शिक्षा वर्ग होतात. त्या काळात या वर्गाना “ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प” म्हणजेच ओटीसी म्हटले जात असे.
स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात ४० दिवसांच्या प्रशिक्षणात सैन्यासारखे प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले जात असे. स्वातंत्र्यानंतर ‘ओटीसी’ला ‘संघ शिक्षा वर्ग’ संबोधले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात प्रशिक्षणात शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणावर जोर असे. नंतर हळूहळू त्यात आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, कृषी, प्रचार, प्रसार माध्यम असे नवे विषयही आले आहेत.
संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण देशभरात अनेक ठिकाणी पार पडतात. मात्र, तिसऱ्या वर्षाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना नागपूर येथील रेशीमबागेत यावे लागते. तृतीय वर्षाचे प्रशिक्षण पूर्वी ४० दिवसांचे होते. सध्या त्याचा कालावधी बदलून २५ दिवसांचा झाला आहे.
संघ शिक्षा वर्गाची पद्धत आणि कालावधी बदलत गेला असला, तरी त्याचा आत्मा नेहमीच व्यक्ती निर्माण असाच राहिल्याचे संघ अभ्यासकांना वाटत आहे. यामुळेच संघ शिक्षा वर्गाच्या प्रणालीत आणि अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यावर गेले अनेक वर्षांपासून मंथन सुरू होते.
दरम्यान, अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या गुजरातमधील भुज येथे झालेल्या बैठकीत प्रशिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता संघ स्वयंसेवकांना व्यावहारिक ज्ञान देणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना फक्त संघापुरते सीमित न ठेवता इतर संघटनेने केलेलं चांगले कार्य देखील दाखवण्याचे ठरवले आहे. शिवाय स्वयंसेवकांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम संघ शिक्षा वर्गासाठी निश्चित केला जाणार आहे. संघ शिक्षा वर्गाच्या प्रणालीत आणि अभ्याक्रमात केले जाणारे बदल वर्ष २०२४ पासून अंमलात आणले जाणार आहेत.